12th Fail - Article by Adv. Mahesh Chavan

जेंव्हा प्रेम हेच यशस्वी होण्याची प्रेरणा बनते.......🩷🩷🩷


"12th Fail " हा केवळ सिनेमा नाही तर एक मोटीवेशनल प्रवास आहे, 12th फेल हा सिनेमा पाहिला, हा विधु विनोद चोप यांचा सिनेमा आहे, यामध्ये विक्रांत मस्सी आणि मेधा शंकर यांच्या प्रमुख भूमिका आहे. ही स्टोरी ips मनोजकुमार शर्मा साहेब आणि त्यांच्या पत्नी श्रध्दा जोशी यांचे वर आधारित आहे, थोडक्यात हा बायोपीक आहे.


मी ज्या दिवशी हा सिनेमा पाहिला त्यादिवशी संपूर्ण रात्रभर माझ्या डोक्यातून चित्रपटातील मनोज काही जाता जाईना, कोणतही संकट असो त्यासमोर भिंतीप्रमाणे भक्कम उभा राहणारा मनोज खरच खूप मोठा संदेश देऊन जातो. आपण छोट्या छोट्या संकटांना घाबरतो पण त्या ऐवजी संकटांना डायरेक्ट भिडणारा मनोज आणि त्याची स्वाभिमानी लढाई हाच चित्रपटाचा मुख्य विषय आहे.


घरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, ग्रामीण भाग आणि upsc चा U देखील माहीत नसलेला मनोज. शाळेत असताना तेथे चालणारी सामूहिक कॉपी आणि त्याच कॉपी सेंटरवरती पोलीस छापा घालतात आणि तेथे होणारी दुष्यंतसिंग या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भेट मनोजच्या जीवनात प्रचंड बदल घडवून आणते.येथूनच सुरू होतो एका प्रामाणिक, स्वाभिमानी मनोजचा अधिकारी होण्याचा एक कठीण प्रवास.


समाजात अनेक मुलं मुली असतील जे आपल्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा निष्कारण बाऊ करतात, खरं तर ज्याला काही साध्य करायचं असत, जीवनात काहीतरी मिळवायचं असत त्याच्यासाठी कोणतंही संकट कधीच अडचण बनत नाही, फक्त यासाठी त्या मुला-मुलींच्या अंगात प्रचंड जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची धमक पाहिजे. हे सर्व गुण यातील मनोज यांचे अंगात नक्कीच होते. घरातून एका ड्रेसवर अधिकारी होण्यासाठी बाहेर पडलेला मनोज ज्याला अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं, परीक्षा कशी असते, DSP उच्च दर्जाचा अधिकारी की SP मोठा हेही माहीत नसलेला मुलगा एक स्वप्न घेऊन दिल्लीच्या दिशेने प्रवास करतो.


माणसानं आपल्या परिस्थितीची कधीही लाज बाळगू नये, जशी परिस्थिती असेल तिचा स्वीकार केला पाहिजे.यातील मनोज देखील अगदी तसाच आहे. अधिकारी होण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन देखील कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा म्हणून दिवसभर पिठाची गिरणी मध्ये काम करून रात्री अभ्यास असा मनोज यांचा दिनक्रम होता. याच प्रवासात त्याची श्रद्धा यांचेशी भेट होते, मैत्री होते आणि नंतर प्रेमही. 


आपण बऱ्याचदा पाहतो की अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मुलगी किंवा मुलींसाठी मुलगा हा अभ्यासातून मन विचलित होण्यासाठी कारणीभूत ठरतो. पण जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करतो त्याच बरोबर त्या दोघांचीही अधिकारी होण्याची स्वप्न असतील आणि त्यासाठी ते दोघे एकमेकांना मदत करत असतील ,अभ्यासासाठी प्रोत्साहन देत असतील तर असे प्रेम हे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कधीच विचलित होऊ देत नाही. यातील श्रद्धा यांचे पात्र देखील अगदी तसेच आहे, यातील मनोज याची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असून देखील खऱ्या प्रेमाच्या भावनेने त्यांनी मनोज यास दिलेली साथ अत्यंत मोलाची आहे. खरं तर हे प्रेमच मनोज यांचे मोतीवेशन होते, मानसिक आधार होता त्यामुळे श्रद्धा यांच्या भक्कम साथीने मनोज यांनी हे यश संपादन केलं.


खरं तर हा चित्रपट ips मनोजकुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. पण मी शर्मा साहेबांची एक मुलाखत पाहिली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, असे कित्येक मनोज असतील जे अत्यंत बिकट परिस्थितीमधून संघर्ष करून पुढे येत असतील, अशा देशातील प्रत्येक मनोजची ही कहाणी आहे. 


लोकांनी या चित्रपटाला खूप पसंती दर्शवली आहे, चांगल्या गोष्टी लोकांना उशिरा समजतात ही वस्तुस्थिती आहे, त्याच उक्तीप्रमाणे हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर खूप दिवसांनी लोकांना चांगला आहे असं समजलं आणि आज लोक स्वतः एकमेकास सदर चित्रपट पाहण्याविषयी सुचवत आहेत. अशा वेळी हा लोकांचा चित्रपट होऊन जातो, चांगल्या कलाकृतीना लोक त्याला डोक्यावर घेतात,हे नक्की.


विक्रांत मस्सी यांची पूर्वी criminal justice ही वेबसिरीज पाहिली होती, त्यामध्ये सुद्धा त्यांनी उत्तम अभिनय केला होता, पण या चित्रपटात अस कुठेही वाटलं नाही कीं विक्रांत मस्सी अभिनय करत आहेत, कारण त्यांनी इतका सरळ साधा नैसर्गिक अभिनय करून मनोज साकारला आहे की अगदी प्रत्यक्ष मनोज यांचा खरोखरचा प्रवास आपण पाहत आहोत असं आपल्याला जाणवतं.


बाकी ips मनोजकुमार शर्मा याना प्रत्यक्ष जवळून पाहता आलं ते आमचे मित्र Api गिरीश चव्हाण यांचे मूळे कारण ते शर्मा साहेबांबरोबर काम करत होते.


हा सिनेमा देशात करोडो मुलांसाठी जे MPSC अथवा UPSC साठी तयारी करत आहेत किंवा जीवनात यशस्वी धडपडत असतील, काही जण प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे खचले असतील त्या सर्वांसाठी हा सिनेमा नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात अजिबात शंका नाही.आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटांमुळे निराश न होता, कसे यशस्वी व्हावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ips मनोजकुमार शर्मा साहेब.


- ॲड.महेश चव्हाण

#12thfailmovie #12thfail 


Comments

Popular Posts