श्रीमंत माधवराव पेशवे - भाग २

 भाग २ 


पेशवे पदी कारभार सांभाळताना माधवरावांना प्रामुख्याने सतावणाऱ्या गोष्टी म्हणजे निजाम, नासिर जंग आणि त्यांचे काकासाहेब. राघोबा दादांनी अनेक वेळेला आडकाठी करून वा काही प्रसंगी उघडपणे माधवरावांच्या विरोधातील भूमिका घेतल्या. 

माधवरावांना अनेक जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन मिळत होते. मल्हारराव होळकर, नाना फडणीस , गोपाळराव पटवर्धन,आनंदराव रास्ते यांसारखे सुभेदार मंडळींचे सहकार्य त्यांना होते. शिवाय न्यायदानाच्या कार्यात रामशास्त्री  प्रभुणे यांसारखे निष्णात कायदेपंडित माधवरावांसोबत होते.

रामशास्त्री यांबद्दल सांगायचे झाले तर पेशवाईत सुरु असलेली वेठबिगारीची प्रथा रामशास्त्रींनीं बंद केली. नानासाहेबांच्या काळात पुणे दरबारचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि नंतर माधवरावांच्या काळात सरन्यायाधीशाची भूमिका अत्यंत कुशलपणे पार पडली.न्यायदान करताना न्यायासमोर सर्वजण सामान असतात हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले.

अश्याच एका प्रसंगी साक्षात माधवरावांनाही खडेबोल सुनावयला ते धसवले नाही. माधवराव पेशवे झाल्यावर सुरवातीला त्यांचा दिवसातील बराच वेळ हा वेदाध्ययन आणि धर्मकार्यात जात असल्याने बराच वेळ सरदार  मंडळींना माधवरावांची वाट पाहत बसावे लगे. रामशास्त्रींनाही न्यायदानाच्या कार्यात सल्लामसलतीसाठी माधवरावांचा वेळ मिळत नसे. शेवटी शास्त्रींनीं माधवरावांच्या हि बाब लक्षात आणून दिली. माधवरावांचा स्वभाव लक्षात घेता इतर कुणीही सरदार मंडळी हे धाडस करू शकत नव्हते. परंतु ज्या शनिवारवाड्यातून अटकेपार स्वारी जाण्याच्या सल्लामसलती झाल्या त्याच वाड्यातून वेदाध्ययन आणि होमहवन यांमध्ये गर्क होत चाललेल्या माधवरावांना शास्त्रींनीं राज्यकर्तव्याची जाणीव करून दिली.

एक प्रसंग असा हि घडला,राघोबा दादा अचानकपणे शनिवारवाडा सोडून वडगावला गेल्याची घटना नमूद आहे. मल्हारराव होळकर, नाना फडणीस , गोपाळराव पटवर्धन ह्यंसारखे बरेच जवळचे मंडळी त्यांना मनवण्याच्या प्रयत्नात होते पण कोणीच सफल झाले नाही ते बघून स्वतः माधवरावांनीही त्यांकडे जाऊन त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही राघोबांनी ऐकले नाही. शेवटी गोपिकाबाई वडगाव ला गेल्यावर त्यांना पाषाण ला जाऊन परत येतो असे राघोबादादा म्हणाले खरे पण ते पाषाण वरून थेट नर्मदातटी गेले व तिकडे जाऊन त्यांनी पेशवाईच्या विरोधात बंड पुकारले. 

पेशवाई विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी निजामाशी ते मिळाले आणि विठ्ठल सुंदर व मुरादखान यांना सोबत घेऊन पैठण क्षेत्र लुटायला सुरुवात केली.हि वार्ता समजताच शनिवारवाड्यावर माधवरावांनी सर्व सरदारांना पाचारण करण्यास सांगितले, मल्हारराव होळकर, आनंदराव रास्ते, पिराजी नाईक निंबाळकर,गोपाळराव पटवर्धन व अनेक इतर सरदार फौजेसह जमा झाली. आता युद्ध निश्चित आहे हे सर्व मंडळी जाणून होती.

आणि अखेर माधवराव आणि राघोबादादा यांच्यात घोडनदीच्या पात्रात युद्ध झाले. परिणामतः माधवराव आळेगावच्या तळावर असताना  अचानक राघोबादादांनी सैन्यासह आक्रमण केले आणि त्यात प्रसंगी माधवरावांनी शरणागती पत्करली.आणि नंतर बराचकाळ राघोबांचे शरणागती बनून राघोबांचा मनमानी कारभार बघत बसण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते. राघोबांनी कारभार हातात घेऊन अनेक बदल केले. माधवरावांच्या जवळच्या सरदारांच्या सरदारकी काढून घेत आपल्या जवळच्यांना देऊ केल्या. दौलताबाद चा किल्ला निजामाला देऊन टाकला.

 गोपाळराव पटवर्धनांना मिरजेवर आक्रमण करून निजामाचे आश्रित बनवले. आणि तोच निजाम पुढे  जेव्हा राघोबांना डोईजड झाला तेव्हा अनेक मराठी सरदार सोबत घेऊन निजाम पुण्यावर आक्रमण करायचा बेत करू लागला. आणि जेव्हा मराठी सरदारांसोबत निजामाची तब्बल १ लाखांची फौज जेव्हा स्वराज्यावर चालून आली तेव्हा इतिहास सामोरा झाला तो  माधवरावांच्या बुद्धिकौशल्य आणि युद्धकौशल्याची साक्ष देणाऱ्या माधवरावांच्या कारकिर्दीतील एका मोठ्या युद्धाला आणि ते होते - राक्षसभुवन चे युद्ध.....


(क्रमशः)


by..

वेदांत उत्पात ,अनिरुद्ध उत्पात

Comments

Popular Posts