वारी : एक चिंतन


    
आज आषाढ शुद्ध एकादशी , म्हणजेच देवशयनी एकादशी, आजच्या दिवशी पंढरीत सर्व संतांच्या पालख्या आणि दिंड्यांसह लाखो वारकरी चालत पंढरीत दाखल होतात. कित्तेक दिवसाचा पायी प्रवास करून पंढरीच्या वेशीवर येऊन  त्यांना होणार जो आनंद आहे त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही.
पंढरपूर आणि पंढरीची वारी म्हटलं कि डोळ्यासमोर उभी राहते ती विठ्ठल- रुक्मिणी ची सुंदर मूर्ती . चंद्रभागेच्या तटी वसलेल्या ह्या नगरीत गेली अठ्ठावीस युगे विटेवरी उभे राहून आजही ती माउली जगाचा उद्धार करीत उभी आहे.
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥
पंढरीची वारी हा फक्त महाराष्ट्राचा नाही तर सर्व विश्वाचा एक सोहळा आहे . हि वारीची परंपरा  १२व्या शतकापासून सुरु आहे. संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज यांच्या सोबत सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावाहून लाखो वारकऱ्यांसह पंढरीच्या दिशेने विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरीला येतात. पंढरीला जाण्याचे महत्व हे संत नामदेवांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे -
सुखलागीं जरी करिसी तळमळ तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ
तेथें अवघाची सुखरुप होसी जन्मोजन्मींचें श्रम विसरसी
चंद्रभागेसीं करिता स्नान तुझें दोष पळती रानोरान
लोटांगण घालोनि महाद्वारीं कान धरोनि नाच गरुडपारीं
नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची इडा पीडा घ्यावी
वारी मध्ये रिंगण हा हि एक सुंदर प्रकारचा सोहळा असतो . रिंगणामध्ये मध्यभागी संतांची पालखी उभी असते आणि पालखी भोवती सर्व वारकरी वर्तुळाकार करून उभे असतात .रिंगण सोहळ्यातील महत्वाचे घटक म्हणजे मानाचे दोन अश्व. सोहळ्यात एका अश्वावर स्वतः माउली विराजमान आहेत अशी मान्यता आहे
हा रिंगण सोहळा जनमाणसांना असाही एक संदेश देतो कि ज्याप्रमाणे रिंगणात केंद्रबिंदू हा साक्षात परमेश्वर आहे आणि त्याच्या भोवतीच संपूर्ण रिंगण फिरत आहे त्याच प्रमाणे मनुष्यानेही त्याच्या कर्माचा केंद्रबिंदू हा परमेश्वर ठेवावा.
अश्व हेच मन , बुद्धी ,आणि षड्रिपू यांचे प्रतीक मानावे आणि अश्व ज्याप्रमाणे रिंगणात पालखी भोवती फिरतात त्याप्रमाणे मनुष्याने कर्म करताना मन ,बुद्धी ,आणि षड्रिपू यांना भगवंता भोवती केंद्रित करावे .

 पालखी सोहोळ्यातील सर्व वैष्णवजनांचा एक अविस्मरणीय आणि नेत्रदिपक असा क्षण म्हणजे बंधूभेट . संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालख्या पंढरीच्या जवळ एकत्र येतात . हा बंधूभेटीचा क्षण सर्व वैष्णवजनांसाठी एक सोहळाच असतो .

पायी यात्रा करून अखेर एकादशीला सकाळी चंद्रभागेत स्नान करून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. ते विठ्ठलाचे सावळे मनोहर असे रूप पाहून त्यांचा इतके दिवस पायी यात्रा करून आलेला क्षीण क्षणात नाहीसा होतो .
देखोनियां तुझ्या रुपाचा आकार उभा कटीं कर ठेवूनियां
तेणें माझ्या चित्ता होय समाधान वाटतें चरण सोडावे
प्रत्येक वारकर्यांची दर्शन घेतानाची भावना हि संत तुकोबांच्या अभंगातील ह्या ओळीप्रमाणेच झालेली असते. विठ्ठलाचे ते सुंदर रूप डोळ्यामध्ये साठवून आपल्या मनातील भावना साकडं म्हणून त्या विठ्ठलाला सांगून परतीच्या प्रवास सुरु करतात .

आषाढी एकादशी चे दुसरे नाव म्हणजे देवशयनी एकादशीहि एकादशी कर्मयोगी जीवनाचा मार्ग दाखवते . देव देवशयनी एकादशी पासून चार मास विश्रामाला जातातयालाच चातुर्मास असेही म्हणतात . या काळात देव आराम करत आहेत म्हणजेच तुमचे दैव तुमच्या सोबत नाही . अश्या परिस्थितीत तुमचे कर्म हेच तुमचे तारक ठरतात , तुमचे कष्ट तुम्हाला फळ मिळवून देतात .
अशी हि एकादशी नीतिमूल्यं आणि अध्यात्मिक शिकवणी सोबत कर्मयोगाची हि शिकवण देते .
   संत परंपरेने तत्कालीन समाजाला नेहमीच नैतिक आणि अध्यात्मिक मार्गदर्शन केले आहे . कधी समजावून तर प्रसंगी खडे बोल सुनावून समाज प्रबोधन केले आहे . वर्षानुवर्षे चालत आलेली हि परंपरा प्रत्येक पिढीला भक्तिमार्ग दाखवणारी आहे . संत सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे सांगणारी आहे . ज्याप्रमाणे अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, त्याच प्रमाणे संत हे अमृताचा विचार सागरआहेत म्हणून ते सार्या समाजाला अमर करू शकतात. याशिवाय संत जे चीन्तु ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत, शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य अयोग्य याचा विवेक बाळगतात, आणि चिंतामणी प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत ,तर त्यांचे समूह आहेत.
म्हणूनच माऊली आपल्या पसायदानात सांगतात -
चला कल्पतरूंचे आरवचेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णवपीयूषाचे |
अवघा संसार आनंदानी व्यापून टाकणाऱ्या ज्ञानोबा माऊली व आदि संतांना अनुसरण्याचा निश्चय करून हि वारी विश्व स्वास्थ्याची होवो हि विठ्ठल - रुक्मिणी चरणी प्रार्थना.

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥




अनिरुद्ध उत्पात.
वेदान्त उत्पात.

Comments

Unknown said…
One of the best blogs guys 👍
Ashwini Utpat said…
Very thoughtful.. keep it up guys..All the best
Unknown said…
खूप छान आहे गेली चार वषे मी वारीला जातोय असाच अनुभव येतो. पण तो शब्दात वर्णन करता येत नाही पण मी वारीचा अनुभव तुझ्या लेखनीतुन अनुभवला धन्यवाद मित्रा.

Popular Posts