महाकवि कालिदास


महाकवि कालिदास


"अरे मंद बुद्धी पुरुषा तुला काही कसेच वाटले नाही कि तू एका विदूषी राजकन्येशी विवाह करू इच्छित होतास? "
 एक नवविवाहित विदुषि राजकन्या आपल्याला निर्बुद्ध माणूस पतीच्या स्वरूपात लाभला आहे हे समजल्यावर तिच्या पतीची व त्याच्या बुद्धिमत्तेची निर्भत्सना करीत होती.
"कुठे माझी लकाकणारी प्रतिभा आणि कुठे तुझी पाषाण बुद्धी? संसार करण्यासाठी तुझ्यात काहीतरी गुण हवा.तुझ्या सारख्या 'दगड' बुद्धी च्या माणसाला सहन करणे कसे शक्य आहे? असा कोणता गुण आहे तुझ्यात कि ज्यामुळे मी तुझ्यासोबत राहू?... 'अस्ति कश्चित वाग्विशेषः? "
असे म्हणून तिने त्याला राजमहाला बाहेर काढले. तो मूढ माणूस राजमहालातून बाहेर येत असताना आपल्या झालेल्या अपमानाचा विचार करत होता.
त्याचा कानात फक्त 'अस्ति कश्चित वाग्विशेषः?' हेच शब्द वाजत होते. तो स्वतःशीच मोठ्याने हे शब्द बोलू लागला होता आणि वारंवार स्वतःला विचारत होता कि ' तुझ्यात एक तरी गुण आहे का?
'बस्स झाले! ' असे म्हणून तो आपल्या मनाशी ठरवतो कि आज जरी लोक मला नावे ठेवत असतील, विचात असतील कि 'अस्ति कश्चित वाग्विशेषः ?' पण भविष्यात मी दाखवून देईन कि मी मूर्ख नाही. माझी विद्वत्ताच माझे नाव अजरामर करेल. असा विचार करून तो विद्याभ्यासासाठी निघाला.
पत्नीचे बोलणे अपमास्पद वाटून त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे कालीदेवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले. परत आल्यावर पत्नीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ’अस्ति’, कश्चित‌’ आणि ’वाग्’ याआरंभीच्या तीन शब्दांनी सुरू होणारे साहित्य रचले.
’अस्ति’पासून - अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नामनगाधिराजः । पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इवमानदण्डः॥ ...कुमारसंभव
’कश्चित्‌’पासून - कश्चित्कांता विरहगुरुणां स्वाधिकारात्प्रमत्तः.।शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ॥...मेघदूत
’वाग्‌’पासून - वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगत:पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ ...रघुवंश
हाच मंद बुद्धी पुरुष पुढे भविष्यात महान कवी -कालिदास ह्या नावाने प्रसिद्ध झाला.
ह्याच महान कलाकृतींमुळे कालिदास हा वैश्विक कवी म्हणूनही ओळखला जातो. पाश्चात्य कवी गटे ह्याने शाकुंतल चे जर्मन भाषेत भाषांतर केले. गटे म्हणतो कि स्वर्गलोक आणि भूलोकाचा आस्वाद घ्यायचा असेल तर शाकुंतल वाचा.
काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्यां शकुंतला। 
तत्रा$पि चतुर्थो अंक: तत्र श्लोक चतुष्टकम्।। 
असे काय आहे शाकुंतल मध्ये? तर भारतिय संस्कृती चे वर्णन, प्रभावशाली गुरुकुल परंपरेचे वर्णन कि जेथे राजालाही विद्यार्थ्यांची सूचना ऐकावी लागते. यातून शिक्षण व्यवस्थेचे स्वातंत्र्य दिसून येते.
 वनात राहिलेल्या शकुन्तलेचे वन्यजीव, प्राणी आणि वनस्पतींवरील सुंदर वर्णन कालिदासानें चितारले आहे.
 शकुंतला वन्यजिवांना म्हणते 'अस्ति मे स्वोदारस्नेह एतेषु '
 हे वाचताना असे वाटते कि कुठे आपण यंत्रवत भावनांचे लोक! आणि कुठे ती संवेदनशील शकुंतला.
 संवेदनशील भावनेचे वर्णन कालिदासाने कण्व ऋषी यांच्या चरित्रातून दाखवले आहे शकुंतलेच्या पाठवणीच्या वेळी ऋषी बेचैन असतात आणि आश्रमातील सर्व प्राणी,वेली,झाडे यांना पाठवणीची कल्पना देताना म्हणतात कि "माझ्यासारख्या वितरागी माणसाला दुःख होत असेल तर सर्व सामान्य लोकांचे ते काय होत असेल? "
रघुवंश हे भारतीय संस्कृती चे दर्शन घडवणारे महान लेखन आहे. रघुकुलाची क्षत्रिय परंपरा व मोठे साम्राज्य असतानाही प्रत्येक रघुवंशी राजाचा असणारा विनम्र स्वभाव ही भारतीय राजसंस्थेची आदर्श परंपरा आहे. दिलीप राजा नंदिनी ची सेवा करतानाचा प्रसंग असो. कौत्साला रघु ने दिलेले वचन असो हे प्रसंग म्हणजे संस्कृतीचे मानबिंदू दाखवणारेच आहेत.
नंदिनी साठी स्वतःचा जीवही देणारा राजा आणि कौत्साला  कुबेराने दिलेले धन  त्यानेच
 घ्यावे ते राजकोषात नको व  कौत्स  हि इतका तेजस्वी कि कुबेराने पाडलेल्या मोहरांच्या पावसातून एक लक्ष्य मोहरा नेईन बाकीच्या मला नको. अहाहा! किती निस्वार्थी वृत्ती, संयमी मन आणि हे तयार करणारी शिक्षण आणि समाज व्यवस्था कसे असतील!

उपमा कालिदासस्य ...
 संचारिणी दिपशिखे रागौ। म्हणून इंदुमतीच्या स्वयंवरात राजांचे केलेले वर्णन असो वा पार्वती शंकराची उपमा असो किंवा ' क्व सूर्यप्रभवो वंश:। ' म्हणून रघुवंश व स्वतःच्या बुद्धीची केलेली तुलना असो अश्या अनेकानेक सुंदर उपमांचा वापर करून काव्याचे सौंदर्य वाढवले आहे .एवढे अद्भुत लेखन असूनही कालिदास रघुवंश लिहिताना म्हणतो.. मंद: कवी यश: प्रार्थी.... हे त्याच्या बौद्धिक नम्रतेचे उदाहरण.
कालिदासाच्या महानतेचे वर्णन करणारी आणखी एक दंतकथा आहे. एकदा दंडी व कालिदास यांच्यात श्रेष्ठत्वावरून भांडण झाले. व ते सोडवण्यासाठी ते सरस्वती देवी कडे गेले. तेव्हा देवी सरस्वती ने कवीदंडी च्या बाजूने निकाल दिला. त्या वेळी कालिदासाने संतापून विचारले कि मग मी कोण? तेव्हा सरस्वती हसून म्हणाली  "त्वमेव मामकी तनु | 

कालिदासाच्या बाबतीत असेही म्हणतात कि जेव्हा संस्कृत कवींमध्ये श्रेष्ठ कवींची गणती केली असता ती कालिदासापासून सुरु होऊन तिथेच संपली.
 पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास; ।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात अनामिका सार्थवती बभूव ।। "
असा हा महा कवी कालिदास आपल्या अजरामर साहित्याने चिरंजीव आहे. कारण -
 जयान्ति ते सुकृतीनः रससिद्धा कविश्वराः नामस्ति तेषां यशः काये जरा मरणजं भयम्। 





अनिरुद्ध उत्पात
वेदान्त उत्पात

Comments

Ashwini Utpat said…
अतिशय सुंदर लेख वाचून मानसिक समाधान मिळाले .....

कालिदासास प्रणाम

Popular Posts